शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टातील सुनावणीस प्रारंभ , एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले

Foto
नवी दिल्ली  : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या जोरदार युक्तिवादानंतर आजपासून शिंदे गटाकडून  युक्तीवादाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली. आजपासून शिवसेनेकडून मुकुल रोहतगी, निरज किशन कौल हे युक्तीवाद करतील.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाची बाजू आणि पुरावे भक्कम रीतीने मांडण्यासाठी सर्व वकिलांशी आणि कायदे तज्ञांशी चर्चा केली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तिवादानंतर शिंदे गटाकडून आजपासून युक्तीवादाला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच हा युक्तिवाद करत असताना पक्षाची बाजू आणि पुरावे भक्कम रीतीने मांडण्यासाठी काल दिल्लीत एकनाथ शिंदे सर्व वकिलांशी आणि कायदे तज्ञांशी चर्चा केली. पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे राहावे यासाठी कायद्याच्या सर्व बाजूंचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात यावी असा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आहे. यासाठी एकनाथ शिंदे काल दुपारनंतर दिल्लीसाठी रवाना झाले होते.
 
आजच्या सुनावणीआधी एकनाथ शिंदे काय म्हणाले? 
निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. धनुष्यबाण हे आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्मितेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. ते चिन्ह गोठवण्याची मागणी करणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुसून टाकण्याचा, महाराष्ट्रातील जनतेचा कौल गोठवण्याचा आणि हिंदुत्व गोठवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. विरोधी पक्षाने केलेली ही मागणी अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत आहोत. २०१९ मध्ये ज्यांनी त्यांची विचारधारा सोडली, त्यांनी जनतेने दिलेला कौलही नाकारला आणि मोडला. आज धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. ते चिन्ह गोठवण्याची न्यायालयात मागणी करणे हा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर बाळगणार्‍या सर्व शिवसैनिकांचा अपमान आहे आणि त्यांच्यासाठी ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली.

आजपासून शिंदेंच्या शिवसेनेकडून युक्तीवाद
महाराष्ट्रातील सद्यस्थितीची तुलना करत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाची मागणी मांडली आहे. कथित बंडखोरी आणि पक्षांतराच्या आधारे मिळालेलं धनुष्यबाण पक्षचिन्ह हे केवळ तथाकथित विधिमंडळ बहुमतावर आधारित असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. संबंधित आमदारांनी पक्षांतर केलं होतं की नाही, याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालयानेच करावा, अशी मागणी कामत यांनी केली. न्यायालयानं पक्षांतर झाल्याचं ठरवल्यास, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह देताना मानलेला मूळ आधारच संपुष्टात येईल, असाही दावा त्यांनी केला.या महत्त्वाच्या आणि आक्रमक मुद्द्यांसह ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या कायदेशीर मुद्द्यावरील युक्तिवाद पूर्ण केला होता.